भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा: लाखनी व अद्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी जेरबद केले. ही संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, अड्याळ व लाखनी पोलिसांनी शनिवारी (5 एप्रिल) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास केली. यात आरोपींकडून एक ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, दोन दुचाकी व चार मोबाईल असा एकूण 11 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विकल्प विश्वशील टेंभेकर (19, रा. धारगाव), शांतनु सतीश शेंडे (19, रा.राजेगाव), अनिस बागडे (22, रा. जवाहर नगर), सागर भोजराम वैरागडे, विशाल सुभाष बागडे (27, रा. नेरी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस स्टेशन लाखनी व अड्याळ परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक नुरूल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रभावीपणे रात्रग्रस्त पेट्रोलिंग राबवून संशयतांची चौकशी करण्याची मोहीम सुरू आहे. अशातच शनिवारी (5 एप्रिल) मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास अड्याळ परिसरातून ट्राली चोरी गेल्याची बातमी नियंत्रण कक्ष भंडारा येथून प्राप्त झाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, अड्याळ व लाखनी पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित ट्रॅक्टरला थांबवून विचारपूस केली असता ट्रॅक्टर चालक विकल्प टेंभेकर याने खैरी येथून ट्रॉली चोरल्याचे सांगितले. तसेच इतर चार साथीदारांच्या मदतीने चोरी केलेल्या ट्रॉल्या परसोडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर, पाच ट्राली, 2 दुचाकी व 4 मोबाईल असा एकूण 11,86,000 रुपयाचा गुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्टेशन लाखनी व पोलीस स्टेशन अड्याळ येथे आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, अड्याळ येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे, जयराम चव्हाण, पोलीस हवालदार गेंदलाल खैरे, प्रदीप डहारे, सतीश देशमुख, सावंत जाधव, सुभाष रहांगडाले, पोलीस शिपाई सचिन देशमुख, शुभम ठाकरे, सुरज गभणे, कौशिक गजभिये, राजेश निर्वाण यांनी केली आहे.
