भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : दरवर्षी पावसाळ्यात भोजापुर येथे पुराचे पाणी येत असल्याने अनेक कुटुंबांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा त्यांना आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे भोजापूर येथील गोसे पूरग्रस्तांच्या समस्या तात्काळ मार्गे लावाव्यात असा इशारा खासदार प्रशांत पडोळे यांनी प्रशासनाला दिला आहे. यासाठी शुक्रवारी (२५ एप्रिल) भोजापूर वासियांसह खासदारांनी रस्त्यावर उतरून जण आंदोलन केले.
भोजापूर येथील सबंधित क्षेत्रात तलाठी द्वारे झालेल्या त्रुटया वगळून संयुक्त मोजणी व पुनवर्सनाची कार्यवाही सुरू करावी, भोजापूर येथील गोसे प्रकल्प बाधीत अन्यायग्रस्त गट क्र. १९९ व इतर गटांची त्वरीत संयुक्त मोजणी करून भुसंपादण कायदा २०१३ च्या “३०” नुसार पुनवर्सन करण्यात यावे, भोजापूर येथील संयुक्त मोजणी व पुनवर्सनाच्या कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशा विविध मागण्यांसह जन आंदोलन करण्यात आले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी भोजापुर वासियांसह जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा गाठून जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. येत्या काही दिवसांत बैठक बोलावून तोडगा काढू तसेच शासनाला तसा प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कोलते यांनी आंदोलकांना दिले.यावेळी चोख पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
