28 एप्रिल पासून कामबंद आंदोलन
भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा: जिल्ह्यात साडेपाचशे संगणक परिचालक ग्रामपंचायतिच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहेत. परंतु डिसेंबर २०२४ पासून संगणक परीचालकांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे परीचालकांनी 28 एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
संगणक परिचालक मानधन तत्वावर कार्यरत असून ग्रामपंचायतिच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहे. परंतु त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाले आहे. डिसेंबर २०२४ पासून संगणक परीचालकांना कामाचा मोबदला मिळाला नाही. तसेच काही परीचालकांचे जुलै २०२४ पासून मानधन थकले आहे. त्यामुळे परिचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना भंडाराच्या वतीने 28 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे, याचा ऑनलाईन व ऑफलाइन कामावर परिणाम होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खंगार यांनी परीचालकांचे थकीत मानधन त्वरित देऊन पुढील मानधन महाराष्ट्र शासन निर्णयानुसार देण्यात यावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
