भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे घडली. ही घटना बुधवारी (16 एप्रिल) सायंकाळी 7 वाजे दरम्यान घडली. विलास डोमा सार्वे (45, रा. गुंथारा) असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे.
बुधवारी गुंथारा येथील बुद्ध विहारात महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याने विलास त्यांची पत्नी मंगला मुलगा निखिल व मुलगी नीलिमा हे महाप्रसाद घेण्यासाठी गेले. दरम्यान सात वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत विलासला कळविले. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने रोख रक्कम, सोने व घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले.
विलास सार्वे हे अशोक लेलँड कंपनीत कंत्राटी मजूर असून यातूनच ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी लागलेल्या भीषण आगीत रोख रक्कम, सोने व घरातील संपूर्ण साहित्य असे एकूण दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे असून नुकसान भरपाई देण्याची मागणी सार्वे तसेच गुंथारा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
