भंडारा दर्पण/प्रतिनिधी
धारगाव: प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर धावतात. मात्र काही चालक वाहकांच्या नियमबाह्य व्यवहारामुळे प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो. धारगाव येथे बस थांबा आदेश असून देखील चालक–वाहक आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
धारगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज शहराच्या ठिकाणी जात असतात. मात्र काही चालक बस थांबवित नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. नागरिकांनाही कामानिमित्त शहराच्या ठिकाणी जावे लागते. मात्र एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी नागरिक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
धारगाव येथील बस बस स्टैंडवर बस थांबा फलक लावून देखील चालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. यावरून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे कळेनासे झाले आहे. संबंधित विभागाचे जर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसेल तर यांना कोण आवर घालणार असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.
