भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२अंतर्गत बक्षीस वितरण व निपुण माता पालक गट, निपुण विद्यार्थी सत्कार सोहळा २७ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. शासकीय योजनांचा व पालकांच्या सहकार्यातून शाळा समृद्ध करा असे आवाहन पालकमंत्री संजय सावकारे यांनी केले.
शाळेचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी पालकांनी शाळेसोबत अधिक जवळीक साधावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे मार्गदर्शन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, मुख्य अतिथी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, सभापती नरेश ईश्वरकर, अनिता नलगोपुलवार, शितल राऊत, रमेश पारधी, जि. प. सदस्य विनोद बांते, नारायण वरठे, वनिता डोये, सोमराज गिरडकर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी (माध्य.) रविंद्र सलामे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
जि. प. प्राथमिक शाळा झाडगावने पटकाविले प्रथम क्रमांक
शिक्षण व क्रीडा विभागाने २६ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यातील विविध शाळांचे मूल्यमापन केले होते. या मूल्यमापनाच्या आधारावर निवडक शाळांना सन्मानचिन्ह व आर्थिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी व तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगडने पटकाविले आहे.













