भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विक्री केंद्र उभारण्यात येईल, असे पालकमंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. नागपूर येथे वस्त्रोदयोग विभागातर्फे प्रस्तावित अर्बन हाटच्या धर्तीवर हे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविमच्या) नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उदयम विकास प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन आज पालकमंत्री सावकारे यांच्या हस्ते गुरुवारी (२७ मार्च) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. लाल बहादूर शाळेच्या बाजूला आरसेटी प्रांगणात तिन दिवसीय बचतगटांच्या विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांनी अर्थकारणात सक्रीय सहभाग घ्यावा.जिल्हयातील 2500 माविमचे बचतगट असुन 32 हजार महिला यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. 2024-25मध्ये 103.72 कोटी कर्जवाटप या बचतगटांना झाले असून कर्ज परतफेडीचे प्रमाण 99 टक्के आहे. पारदर्शी आर्थिक व्यवहारामुळे महिला बचतगटांनी विश्वसनिय ग्राहक म्हणून ओळख निर्माण केली आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सावकारे म्हणाले.
आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी बचतगटांच्या माध्यमातुन महिला हस्त कौशल्यांच्या व कुशल कारीगीरीच्या अनेक उत्पादनांची मागणी करतात. ज्याला मोठी मागणी असते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हास्तरावर विक्री केद्रासाठी जागेची मागणी त्यांनी यावेळी केली. या विक्री केंद्रासाठी असलेल्या जागेतूनच बचतगटांना प्रशिक्षण व त्यांच्या बैठकासाठी, कार्यक्रमासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी माविम बचतगटांच्या कामाचा आढावा घेतला. प्रास्ताविक संगिता भोंगाडे यांनी तर आभार प्रफुल अवघड यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने बचतगटांच्या महिलांची उपस्थिती होती.
