आरोपीचे लाखनी पोलिसांत आत्मसमर्पण
भंडारा दर्पण/प्रतिनिधी
लाखनी: अनैतिक संबंधातून गावातीलच तरुणाने विधवा महिलेचा नायलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची घटना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मोगरा/शिवणी येथे शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी ३ वाजेदरम्यान घडली. पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७ वर्षे,रा. मोगरा/शिवणी, ता. लाखनी) असे मृतक महिलेचे नाव असून खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७ वर्षे, रा.मोगरा, त. लाखनी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
या घटनेतील मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या २ मुलांचा सांभाळ करीत होती.गत काही वर्षापूर्वी तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान,शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले आणि नंतर आरोपीने रस्सीने गळा आवळून तिचा निर्घृणपने खून केला.
मृतक पुष्पा व आरोपीचे मागील अडीच वर्षापासुन अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मोगरा येथील नाल्याजवळ मृतक महिलेचे शेत आहे.शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे.घटनेच्या दिवशी मृतक महिला ही शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती.थोड्या वेळाने आरोपी तिथे गेला. यादरम्यान दोघात वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने महिलेचा दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला.
यानंतर आरोपीने लाखनी पोलिस ठाणे गाठले व हत्येची कबुली दिली.लगेच पोलिस घटनस्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले.घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हान,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव व लाखनी पोलिस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. प्रकरण गंभीर असल्याने फॉरेन्सिक चमूला पाचरण करण्यात आले होते.वृत्त लिहीपर्यंत लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
