भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा: गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी महाबोधी महाविहार बांधले होते. त्या ठिकाणी अवैध ताबा करण्यात आल्याने संबंधित जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे 22 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावे, नवीन बौद्ध कायदा तयार करावा या मागण्यांसह देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 3 मार्चला जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीला निवेदन देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 8 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणा प्रदर्शन करण्यात आले. तर तिसऱ्या टप्प्यात 22 मार्चला जिल्हा मुख्यालय वर रॅली प्रदर्शन होणार असून शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक असा रॅलीचा मार्ग असणार आहे. रॅली मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा संघटक अभय रंगारी यांनी केले आहे .
