भंडारा दर्पण/प्रतिनिधी
धारगाव: परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. शेतकरी धानाला वॉटर पंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा करतात. त्यामुळे सचिन पंचबुद्धे यांच्या शेताजवळील 63 केवीच्या ट्रांसफार्मरवर सतत लोड येत असल्याने ट्रांसफार्मर वारंवार बंद पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासमोर मांडली. अखेर आमदार भोंडेकरांच्या प्रयत्नाने 100 केवीचे ट्रांसफार्मर मंजूर झाल्याने शेतकरी सचिन पंचबुधे, प्रविन नावरे, दिनेश रेहपाडे, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, उमेश रेहपाडे, रोशन गभने, बाबुराव हलमारे, श्रीकांत वैदय, घनश्याम बोरकर, स्वप्निल ठवकर, महादेव डोंगरवार, राजू गायधने यांनी आमदारांचे आभार मानले.
शेतकरी सतत नापिकीच्या दुष्टचक्रात अडकत चालला आहे. रोगराई, पूर परिस्थिती तर कधी खंडित वीजपुरवठा यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करीत असतो. मात्र एनवेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकाला पुरेसे पाणी होत नाही. याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.
धारगाव येथील शेतकऱ्यांना पाण्याची गरज असताना सचिन पंचबुद्धे यांच्या शेतात जवळील डीपीवर लोड येत असल्याने ट्रांसफार्मर जळले. त्यामुळे पाण्याअभावी शेताला भेगा पडल्याने शेतकरी चिंतेत पडले होते. शेतकऱ्यांनी आमदार भोंडेकर यांच्याकडे पाठपुरावा करून 63 ऐवजी 100 केवीचे ट्रांसफार्मर बसविण्याची मागणी केली. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विद्युत विभागाला याबाबत अवगत करून 100 केवीचे ट्रांसफार्मर मंजूर करून घेतले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण असून काही तासातच ट्रांसफार्मर बसविण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
