भंडारा दर्पण/प्रतिनिधी
साकोली: अल्पवयीन मुलीचे आईवडील घरी नसल्याची संधी साधून १९ वर्षीय नराधमाने पिडीत मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना साकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ मार्च रोजी उघडकीस आली. सौरभ उर्फ थलीराम मेश्राम (वय १९ वर्षे, रा.कनेरी/राम., त.सडक/अर्जुनी, जि.गोंदिया) असे आरोपी नराधमाचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी १६ मार्च रोजी पिडीत मुलीचे आईवडील व भाऊ बाहेरगावी गेले होते. त्या रात्री त्यांनी तिथेच मुक्काम केला.आरोपीची पिडीत मुलीसोबत थोडीफार ओळख होती. याच संधीचा फायदा घेत हा रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. घराचे दार आतून बंद केले व पिडीत मुलीवर तिच्या इच्छेविरूद्ध बळजबरीने अतिप्रसंग केला.
सोमवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास मुलीच्या घराशेजारी राहत असलेल्या अजोबाने फोन करून मुलीच्या वडीलाला तुमच्या घरी कुणीतरी असल्याचे सांगितले. काही वेळातच पिडीतेचे आईवडील घरी परत आल्यावर घरात त्यांना आरोपी मिळाला. सोमवारी पिडीत मुलीचे आईने साकोली पोलीस ठाणे गाठले व घडलेल्या प्रकारची तक्रार दाखल केली.
पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी आरोपी सौरभ उर्फ थलिराम मेश्राम विरुद्ध अपराध क्र.१४३/२५, कलम ६४(२)(आय), ६५( १ ),३३३ भारतीय न्याय संहिता २०२३ व बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ४,६,८अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी सौरभ मेश्राम यास पोलीसांनी अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.
