भंडारा दर्पण/ प्रतिनिधी
भंडारा: तालुक्यातील आंबाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आशिर्वाद नगर गिरोला येथील नागरिकांचे मागील १५ वर्षांपासून रस्त्याअभावी हाल होत आहेत. या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे गिरोला वासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात आशिर्वाद नगर गिरोला येथील२०० मीटरचा मुख्य रस्त्यावर तीन महिने पाणी साचले असते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. विशेषतः शाळकरी मुलांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक असून त्यांना पाण्यातून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. याकडे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत असून पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतः जलमय होत असल्याने नागरिकांना धोका पत्करून या रस्त्याने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात एखादी अनुचित घटना घडल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना देखील गावात प्रवेश करता येत नाही.पावसाळ्याला काही महिनेच शिल्लक असल्याने प्रशासनाने याकडे गंभीरतापूर्वक लक्ष देऊन तात्काळ रस्त्याची समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा गिरोला येथील नागरिकांनी दिला आहे.













