प्रतिनिधी/भंडारा
एका अल्पवयीन मुलीचे शाळेसमोरून अपहरण करून तिला जंगलात नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. मात्र मुलीने धाडसाने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेतली. याप्रकरणी तुसमर पोलिसांनी शुभम उईके (२१) रा. सौदेपूर, ता. तुमसर याला अटक केली आहे.
शुभम हा अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शाळेबाहेर शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी घेऊन उभा होता. विद्यार्थिनी घरी जात असताना, ‘तुला मामाच्या घरी सोडून देतो’, असे म्हणत शुभम विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवून जंगलात घेऊन गेला. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान दाखवत अंगणवाडी सेविकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीची सुटका केली.
अल्पवयीन मुलीच्या आईने तुमसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी विरुद्ध कलम १३७ (२) ९६ भारतीय न्याय संहिता पोक्सो १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम साठे करीत आहेत.













