प्रतिनिधी/भंडारा
रस्त्याने जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमास अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिध्द झाल्याने दि. १३ मार्च २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधिश सी. एल. देशपांडे यांनी २० वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मधुकर रंगारी रा. ओपारा ता. लाखांदूर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे दि. ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी पीडित बालिका ही आपल्या चुलत बहिणीसोबत रस्त्याने जात असताना आरोपी मधुकर रंगारी याने दोन्ही पिडीतांना घरात बोलाऊन अत्याचार केला. त्यावेळी घराचे दार ठोठावत असल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांनी आरोपीला अटक करून तपास केला.
तपासाअंती जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिशसी. एल. देशपांडे यांच्या न्यायालयात चालली. यावेळी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी बाजू मांडून साक्षदार तपासले. दि. १३ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून साक्षपुराव्याच्या आधारे मधुकर रंगारी याचेविरूध्द आरोप सिध्द झाल्याने २० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लाखांदूरचे पो. ना. रवींद्र मुज्जमकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.













