प्रतिनिधी/लाखनी
सण २०२२-२३ या वर्षातील वन व वन्यजीव संरक्षणार्थ उत्कृष्ठ कार्यासाठी भंडारा वनविभागातील लाखनी वनपरिक्षेत्रातील बिटरक्षक त्रिवेणी घनश्याम गायधने यांना ११ मार्च रोजी राज्य सरकारतर्फे सुवर्ण पदक जाहीर करण्यात आला. त्या अनुषंगाने वन संरक्षक (प्रादेशिक) नागपूर श्रीलक्ष्मी ए. यांनी या उत्कृष्ठ कार्यासाठी प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केले.
वनरक्षक त्रिवेणी गायधने यांनी सन २०२२-२३ या वर्षात अड्याळ वन परिक्षेत्रातील डोंगरगाव/न्या. बिटात वन व वन्यजीव संरक्षणार्थ अवैध शिकार, अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, वन्य प्राण्यांच्या मांसविक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडून वन गुन्हा दाखल केला होता. तसेच शिकारीच्या बेतात असलेल्या शिकऱ्याना शिकारीपुर्वीच साहित्यासह पकडले होते. त्याचबरोबर शासकीय गटातील वृक्षांची अवैध तोड करून विनापरवाना लाकडे ट्रॅक्टरने वाहतूक करतेवेळी पकडून वन गुन्हा जारी केला होता. जखमी वन्यप्राण्यांना रेस्क्यू करून त्यांचेवर औषधोपचार करून त्याना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना सुवर्ण पदक जाहीर झाला.
त्रिवेणी गायधने यांनी यशाचे श्रेय उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई, सहाय्यक वन संरक्षक वाय. बी. नागुलवार, सहा.वन संरक्षक साकोली संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्रसहाय्यक किटाडी एच. आर. शेख व किटाडी सहवन क्षेत्रातील कर्मचारी व कुटुंबीयांना दिले आहे.
