प्रतिनिधी/भंडारा
भंडारा तालुक्यातील वन विभागाच्या एका बिटातील रोजंदारीवर काम करणारा एक वन मजूर चक्क वसुली एजंट असल्याची चर्चा धारगाव परिसरातील नागरिकांत रंगू लागली आहे. त्यामुळे या वन मजुराला अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वन विभागात वन संवर्धन, वन संरक्षण, वनीकरण, रोपवाटिकेत रोपे तयार करणे, रोपवनाची देखभाल, आगीपासून संरक्षण, जल संवर्धन आदी कामांसाठी वन मजुराची रोजंदारीवर नियुक्ती केली जाते. मात्र रोजंदारी तत्वावर असलेल्या त्या वन मजुराला आपल्या कामाचा विसर पडला असून त्याने चक्क वसुली एजंटची भूमिका घेतल्याची चर्चा नागरिकांत आहे. नेमका तो कोणाच्या सांगण्यावरून वसुली करतो हा प्रश्न देखील नागरिकांना पडत आहे.
दीड महिन्या अगोदर आपले बीट सोडून दुसऱ्या बीटात एका जेसीबी चालकाकडून वसुली करून या वन मजुराने चालकाला मारहाण केली होती. याचा राग मनात बाळगून काही वाहन चालकांनी त्या मजुराला चांगलेच चोपले होते. मात्र गावकऱ्यांनी त्याला वाचवले. त्यावेळी त्याने तिथून पळ काढला होता. यावरून त्या रोजंदारी वन मजुराला एवढे अधिकार कोणी दिले? त्याला कोणाचे अभय आहे? तो नेमका कोणासाठी काम करतो? असे नानाविधी प्रश्न नागरिकांत उपस्थित केले जात आहेत.
त्या बिटातील परिसर हा जंगल व्याप्त असून वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी वनविभागाकडे अर्ज करतो. मात्र नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी अनेकदा वन विभागाचा कर्मचारी न जाता खुद्द हा वसुली एजंट जात असतो. तसेच अधिक नुकसान भरपाईची मिळवून देण्यासाठी तो आर्थिक लालच देत शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची देखील चर्चा त्या परिसरात होत आहे. त्यामुळे त्या वसुली एजंटला कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
