प्रतिनिधी/तुमसर
घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील रामकृष्ण नगरात शनिवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कुंदा भूपेंद्र पाहुणे (२५) असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर भूपेंद्र गणेश पाहुणे (२५, रामकृष्ण नगर) असे आरोपी पतीचे नाव असून तुमसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कुंदा पाहुणे ही महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी भूपेंद्र याचा पत्नीशी वाद झाला. वाद विकोप्याला जाऊन रागाच्या भरात भूपेंद्रने स्वयंपाक घरातील सुरीने पत्नीचा गळा चिरला. त्यात तिने स्वतःला कसेबसे सावरत रक्ताच्या थारोळ्यात बाहेर निघून शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली. त्यातून सदर घटना उघडकीस आली. तुमसर पोलिसांना घटनेची माहिती देऊन स्थानिकांनी लगेच जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय माहितीनुसार महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून रक्तस्राव झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.













