प्रतिनिधी/जवाहरनगर
भंडारा तालुक्यातील सावरी जवाहरनगर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला २०२२ मध्ये मंजुरी मिळाली. ३ वर्ष लोटूनही अद्याप जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून घागर मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा सरपंच गिरीश ठवकर यांनी दिला आहे.
कोट्यवधी रूपये खर्च करूनही ग्रामस्थांना जलजीवन योजनेचे पाणीच मिळत नसल्याचे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहे. नागरिकांना मात्र, शुध्द पाणी सोडा साधे पाणीही मिळत नाही. त्यामुळे जलजीवन योजनेला घरघर लागली असून भ्रष्ट अधिकाऱ्याद्वारे ठेकेदारांचेच पोषण केले जात असल्याचा आरोप होत आहे. हर घर जल,घर घर नल या संकल्पनेवर जलजीवन मिशन योजना सर्वत्र राबविली जात आहे.
भंडारा तालुक्यातील सावरी जवाहरनगर या गावाला सुद्धा योजने अंतर्गत एक कोटी ७ लाख ९२ हजार रुपये निधी प्राप्त झाला. मात्र तीन वर्षे लोटूनही गावामध्ये एक थेंब नळाला पाणी आलेले नाही. नळ योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ ला भेटला असून योजनेचे काम पूर्ण होण्याची मुदत ३० मार्च २०२४ आहे. मात्र कंत्राटदाराने मुदतीत काम पूर्ण केले नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
कामात दिरंगाई होत असल्याने २६ जानेवारी २०२५ ला झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी नळ योजनेच्या मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे संबंधित विभाग व कंत्राटदार यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबतचे ठराव ग्रामसभेत घेण्यात आले. मात्र ३४ दिवस लोटून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त गावकरी तसेच सरपंच ठवकर यांनी प्रशासना विरोधात घागर मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सावरी येथील काम हाती घेतले गेले. काम पूर्णत्वास येत असताना शासनाचा निधी प्राप्त झाला नसल्याने कामे रेंगाळली आहेत. निधी प्राप्त होताच उर्वरित कामाला सुरुवात केली जाईल.
श्री एच.व्हि. बन्सोड
उपविभागीय अभियंता
जल जीवन मिशन अंतर्गत गाव पातळीवर करीत असलेल्या कामाची टप्पा निहाय निधी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा कडून मिळणे अपेक्षित होते. मात्र झालेल्या कामाचेही निधी मिळत नसल्याने पुढील कामे निधी अभावी कसे करावे. पूर्वीच साहित्य खरेदी व लेबर पेमेंट करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेऊन वाटप केले गेले आहे. पुन्हा कर्जाच्या खाईत जाण्यापेक्षा कामे थांबविणे योग्य आहे.
नरेंद्र धाबेकर
कंत्राटदार
पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासंबंधी कित्येकदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार केला आहे.परंतु याबाबद अधिकारी बोलायला तयार नाही. कंत्राटदारांना फोन केला असता प्रतिसाद देत नाही. सावरी(इंदिरानगर)ग्रामस्थांना पाण्यासाठी वंचित राहण्याची वेळ आली आहे.ग्रामपंचायतचा कामात कुठलाही हस्तक्षेप नसुन जल जीवन मिशन ही शासनाची योजना पांढरा हत्ती ठरत आहे.
गिरीश ठवकर
सरपंच, ग्रामपंचायत, सावरी जवाहरनगर













