प्रतिनिधी/भंडारा
जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीचा मागील सहा महिन्यांपासून विनयभंग करणाऱ्या विरोधात पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष सुरेश कानझोडे (२८ वर्ष) रा. परसोडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता ११ वीत शिकत आहे. पीडिता अल्पवयीन असल्याची जाणीव असताना देखील आरोपीने तिच्या घरी तसेच सुनसान ठिकाणी नेऊन अनेकदा तिचा विनयभंग केला. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेचे वडील भंडारा येथील एका दुकानात कपडे शिवण्याचे काम करतात तर आई घरकाम करते. पीडितेच्या घराजवळ आरोपी सतिष सुरेश कानझोडे याचे घर असून टो विवाहित आहे. आरोपीचे पीडितेच्या घरी येणे जाणे असायचे. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित मुलगी घरी आलेली होती. त्यावेळी आरोपीची पत्नी आणि वडील घरीच होते. मात्र त्यांची नजर चुकवत त्याने पीडितेच्या विनयभंग केला. त्यानंतर प्रत्येकवेळी पीडिता घरी आली की आरोपी तिचा विनयभंग करीत असे.
भीतीपोटी पीडितेने कुणाला काही सांगितले नाही. अखेर ४ दिवसांपूर्वी पीडितेने तिच्या मोठ्या आईजवळ तिच्यासोबत घडलेले सर्व प्रकार सांगितले. मोठ्या आईने तिला पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने चाईल्ड हेल्प लाईनला फोन करून तक्रार करायची असल्याचे सांगितले. अखेर चाईल्ड हेल्प लाईन कार्यालयात जाऊन मुलीने आपबिती सांगितली आणि नंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी सतिष कानझोडे याच्या विरोधात पोक्सो आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जवाहर नगर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहेत.













