प्रतिनिधी/भंडारा
तुमसर तालुक्यातील चिखला येथील मॅग्नीज खाणीचा बोगदा खचून दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (5 मार्च) सकाळी घडली. प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेत जखमीची विचारपूस केली.
चिखला माईन्स अंडरग्राउंड लेव्हल 3 मध्ये 100 मीटर खोली असलेल्या ठिकाणी सकाळ पाळीचे कामगार काम करत होते. बुधवारी (5 मार्च) सकाळी 9 ते 9.30 दरम्यान अचानक स्लॅब कोसळले. या ढिगाऱ्याखाली तीन कामगार दबले. त्यातील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.विजय नंदलाल (50, रा. खरपडी तिरोडी), अरुण जीवनलाल चोरमार (41, रा. सीतासावंगी) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. तर शंकर सहदेव विश्वकर्मा जखमी आहेत.
दरम्यान, या घटनेत आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची शासनस्तरावर चौकशी करावी. घटनेतील अपघातग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देऊन कायम स्वरुपी नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे.
