प्रतिनिधी/धारगाव
भंडारा जिल्हा धानासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. भंडारा तालुक्यातील धारगाव परिसरातही यंदा मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु पाण्याविना पीक वाळत असून शेतजमीनला भेगा पडल्या आहेत. मात्र नहर प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नाही.
दरवर्षी कीटकनाशके, खते, बियाणे व मजुरी यांच्यात मोठी वाढ होत असल्याने शेती ही तोट्याची ठरत आहे. खरीपानंतर उन्हाळी पीक घेऊन शेतकरी कसाबसा आपला उदरनिर्वाह करीत आहे. परंतु शेतीला मुबलक पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना राहिली नाही. मागील वर्षी करचखेडा उपसा सिंचन योजनेद्वारे नहराला भरपूर पाणी देण्यात आले. त्यामुळे धारगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली. मात्र मार्च महिना सुरू होऊन देखील शेतीला नहराचे पाणी मिळत नसल्याने जमिनीला भेगा पडल्या असून धान पिक वाळण्याच्या अवस्थेत आहे.
नहरात झुडपांचे साम्राज्य
शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने नहर तयार केले. मात्र नहराच्या देखभाल दुरुस्ती अभावी नहरात झाडी झुडपांचे साम्राज्य वाढले असून टेल वरील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नाही. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून याचा फटका गोरगरीब शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे प्रशासन व संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी धारगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.













