संजय भोले/भंडारा
लाईनमन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटकच. ‘लाईनमन’ हा शब्द ऐकला की, डोळ्यासमोर येतो तो विजेचा खांब, तार आणि धोकादायक काम करणारी एक महत्त्वाची व्यक्ती. फरक इतकाच की, ज्यावेळी त्यांची गरज भासते, त्याचवेळी त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. ४ मार्च रोजी दरवर्षी लाईनमन दिवस साजरा केला जातो. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी दिवस-रात्र अथक परिश्रम घेणाऱ्या या लाईनमनचे समाजाप्रति योगदान अर्थातच अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते.
विजेच्या निर्मितीनंतर पारेषण, वितरण अशा टप्प्यांमध्ये ग्राहकांच्या घरापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना दक्ष राहावे लागते.
वीज यंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला, तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-अपरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावावे लागते. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो.
उन्हाचा तडाखा, तापलेली वीज यंत्रणा, वाढलेली विजेची मागणी, त्यानंतर वादळे, मान्सूनपूर्व धुवाँधार पाऊस व त्यानंतरचा पावसाळी संततधार पाऊस, पूरस्थिती अशा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे ‘प्रकाशदूत’ सज्ज असतात. महावितरण कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहक सेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीज बिलांची वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीज चोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्त्वाची कामे करावी लागतात.













