प्रतिनिधी/भंडारा
भंडारा तालुक्यातील काँग्रेसचा गड असलेल्या एका जिल्हा परिषद क्षेत्रात दुसऱ्या तालुक्यातील एका पार्सल उमेदवाराने आर्थिक बळावर निवडणूक लढली. यात तो यशस्वी देखील झाला. मात्र निवडून येताच क्षेत्रातील समस्यांचा त्याला विसर पडला असून जिल्हा परिषद क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आह
भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. भंडारा तालुक्यात देखील उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या परिसरातील शेतकरी पीक वाचविण्यासाठी अनेक संकटाचा सामना करीत आहे. मात्र त्या जि. प. सदस्याला शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाही. त्यातच गावातील रस्ते, नाल्यांच्या समस्या तसेच शाळा, रुग्णालयात होणाऱ्या सुविधा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद क्षेत्र ग्रामीण भागात मोडत असून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी जातात. परंतु बस थांबा असूनही बस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र या परिस्थिती वरून त्या लोकप्रतिनिधी सदस्याला क्षेत्रातील जनतेच्या समस्येशी काही देणंघेणं नाही हे स्पष्ट होते. याच जि. प. सदस्यांनी निवडणूक काळात काही मर्जीतील लोकांना हाताशी धरुन आर्थिक बळावर निवडणूक जिंकली. मात्र बाहेरचा पार्सल सदस्य आता नको, अशी ओरड त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांत आहे.













