प्रतिनिधी/साकोली
म्हणतात ना, कलियुगात मनुष्याची इमानदारी संपलेली आहे.असे नाही,तर साकोली आगार राज्य परिवहन मंडळाच्या वाहक आणि चालकांनी हे सिद्ध करून दाखविले आहे व आजच्या कलयुगातही आमची प्रमाणिकता आजही जिवंत आहे हे दाखवून दिले आहे. साकोली आगाराच्या साकोली-संभाजीनगर या बसमध्ये एका प्रवाशाची रोख रकमेसह अतीमहत्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविली. पण कर्तव्यावरील त्या जागृत वाहकाने समाज माध्यमांची सहायता घेत २४ तासात ती पर्स खामगांव जि.बुलढाणा येथे त्या गृहस्थांच्या सुपूर्द करण्यात आली.हिच राज्य परीवहन महामंडळाच्या चालक व वाहकाची माणूसकी व इमानदारी म्हणावे लागेल.
शुक्रवार २८ फेब्रुवारी सकाळी साकोली-संभाजीनगर बसने साकोली येथून प्रस्थान केले.यात यादव बोरकर रा.नवेगावबांध जि. गोंदिया यांनी खामगांव येथे जाण्याकरिता आपला प्रवास सुरू केला.प्रवासा दरम्यान खामगांव पर्यंत त्यांची पर्स त्यात मुळ कागदपत्रे व ११ हजार रुपये होते ही हरविली व यातच ते कागदपत्रे गेली म्हणून निराश होऊन खामगांव येथे परतले होते.यातच रात्री बसचे वाहक पंजाब श्रीरामे व चालक भुषण निखाडे यांना ती पर्स आढळली. त्यांनी पर्समधे पाहणी करीत हा संदेश साकोली मिडीयाशी संलग्न असलेल्या एका व्हाट्सअप ग्रुपवर संदेश टाकला.तो संदेश समाज माध्यमांतून धडाधड शेयर झाला.
अखेर नवेगावबांध येथे त्यांच्या मुलांपर्यंत हा संदेश ग्रुपमध्ये गेला आणि यामध्ये दिलेल्या वाहकाच्या फोनवर संपर्क साधला गेला.पुढे परतीच्या प्रवासात संभाजीनगर-साकोली ही बस खामगांव बसस्थानक येथे आली व ते गृहस्थही आले.येथे शनिवारी १ मार्चला खामगांव बसस्थानक प्रमुख तांबे मॅडम, साकोली आगाराचे वाहक पंजाब श्रीरामे व चालक भुषण निखाडे यांनी ती पर्स यादव बोरकर यांच्याकडे सुपूर्द केली.याक्षणी त्या गृहस्थाने राज्य परिवहन महामंडळाच्या या इमानदार वाहक चालकांचे मनस्वी आभार मानून राज्य परिवहन महामंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.ही बाब सोशल साकोली मिडीयाला वाहकांनी सांगितली आणि या विषयावर जनतेसमोर सत्यस्थिती व राज्य परिवहन महामंडळाची माणूसकी याबाबद दखल घेतली त्याबद्दल साकोली मिडीयाचे साकोली बसस्थानक चालक वाहकांनी आभार मानले आहे.
