भंडारा दर्पण/प्रतिनिधी
धारगाव : धान पिक गर्भावस्थेत असताना पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. टेलवर पाणी पोहोचत नसल्याने पिक वाचविण्यासाठी धारगाव येथील शेतकरी भर उन्हात नहरात खोदकाम करून टेलवर पाणी पोहोचविण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत. यावरून संबंधित विभागाने कोणतीही उपाय योजना न करता याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
गत वर्षी नहराद्वारे करचखेडा उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. शेतीला नहराचे मुबलक पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी रोवणी केली. मात्र पाणी मिळत नसल्याने जमिनीला भेगा पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले. नहरात कचऱ्याचे साम्राज्य असून तसेच संबंधित कंत्राटदारामार्फत योग्यरीत्या काम झाले नसल्याने टेलवर पाणी पोहोचत नसल्याचे शेतकरी सांगतात.
अशातच धान शेवटच्या टप्प्यात असून पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. तोंडी आलेला घास हिरावला जाऊ नये यासाठी शेतकरी स्वतः नहरात उतरून साफसफाई तसेच खोदकाम करून भर उन्हात टेलवर पाणी पोहोचविण्यासाठी धडपडत आहेत. मात्र संबंधित विभागाला याची जराही कीव वाटत नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.













