भंडारा दर्पण/प्रतिनिधी
लाखनी: जागतिक जल दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.
या सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी निबंध स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक गर्दीपसिंग गिल, साक्षी अतकरी, कुमारी सिडामे, वकृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक अनुक्रमे राज कलचुरी, राजश्री टेंभरे व साक्षी अतकरी क्रमांक देण्यात आले. ‘पाणी आहे तर जीवन आहे’ या घोषणा देत विद्यार्थ्यांनी पाण्याच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले. जल दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण केले.
दिनांक 22 मार्च रोजी लाखनी येथील ऑक्सिजन पार्कजवळ विद्यार्थी एकत्रित झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये बीए, बी.एससी आणि बी.कॉम विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि ‘जल ही जीवन है’ अशा घोषणांनी संपूर्ण शहरात जागृती घडवली.तलावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी या वेळी केला.
प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाचविणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जलप्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संचालन भूगोल विभागाच्या प्रा. स्वाती नवले यांनी तर आभार डॉ. बंडू चौधरी यांनी मानले.













