प्रतिनिधी/भंडारा
आयुध निर्माणीतील चार्जमन पदाच्या पदोन्नतीसाठी २०२३-२४ मध्ये झालेल्या विभागीय परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराने परीक्षेचे पेपर लिक करण्यासाठी १० जणांकडून सुमारे ५१ लाख रुपये घेतल्याने पात्र असूनही काही उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालय, संरक्षण विभाग आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास करताना नागपूर पोलिसांनी भंडारा येथील आयुध निर्माणीतील सात लाख रुपयांची रक्कम जवळ बाळगणाऱ्या एका कर्मचाऱ्यासह कंत्राटदारास ताब्यात घेतले आहे. तर दोन जण फरार आहेत. या प्रकरणात नागपुरातील बुटीबोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये देशातील ४१ आयुध निर्माणी फॅक्टरीमध्ये चार्जमन पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि पदोन्नती मिळवण्यासाठी आयुध निर्माणीतील जवळपास १० कर्मचाऱ्यांकडून ५ ते ८ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भंडारा, अंबाझरी, चांदा येथील आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये सुमारे १०० चार्जमन नियुक्त करण्यात आले. अशास्थितीत आयुध निर्माणीत अपात्र आणि वशिलेबाजीने कर्मचाऱ्यांना कामावर लावले तर मोठी दुर्घटना घडू शकते, ही भीती लक्षात घेता परीक्षा दिलेल्या, परंतु अनुत्तीर्ण झालेल्या काही पात्र कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि बुटीबोरी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर नागपूरचे सहायक पोलिस अधीक्षक दीपक अग्रवाल यांच्या पथकाने १९ फेब्रुवारीला भंडारा आयुध निर्माणी गाठून तपास सुरू केला. यात नागपूर पोलिसांनी आयुध निर्माणी भंडारा गाठून विभागीय स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागवली. यातील ३० नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी दररोज दोन ते तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.
संशयिताच्या बॅगमध्ये ७ लाख रुपये रोख आढळून आल्याने फुटले बिंग
याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी कर्मचारी बच्चन कुमार राजेंद्र यादव वय ३४ ह.मु. जवाहर नगर ऑर्डनन्स फॅक्ट्ररी, भंडारा याला संशयावरून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये ७ लाख रुपये रोख आढळून आले. पोलिसांनी असता त्याने ही रक्कम अशोक शेंडे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. अशोक शेंडे याने आयुध निर्माणी फॅक्टरीतील पदोन्नती परीक्षेचे पेपर लिक करून माहिती देण्यासाठी जवळपास १० तरुणांकडून ५१ लाख रुपये उकळले असल्याचे सांगत त्यापैकी सात लाख देणे असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी सात लाखाची रक्कम जप्त केली असून त्यामुळे पदोन्नती परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत पोलिस उपनिरिक्षक मुन्नासिंग यादव बुटीबोरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन बुटीबोरी नागपूर ग्रामीण पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी रात्री दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकारणात अजून बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.













