प्रतिनिधी/भंडारा
जिल्ह्यात शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा केला जात होता. त्यामुळे शेतकरी आपले पीक अस्मानी व सुलतानी संकटातुन वाचवून आपली व संपूर्ण देशाची उपजीविका करत होता. मात्र शासनाला शेतकऱ्यांचे हे सुख बघवले नाही. त्यांनी आता शेतीसाठी फक्त 8 तास वीज पुरवठा सुरू केल्याने शेती धोक्यात आलेली आहे.
शेतकरी कर्ज बाजारी होऊन शेती करीत आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने 8 तास वीज पुरवठा केल्याने पीक कसे घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. एकीकडे विदेशी कंपन्यांना 24 तास वीज पुरवठा केला जातो. तर शेतकऱ्यांना मात्र आठ तास वीज देऊन शासन शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.
शेती व्यवसाय पाण्यावर अवलंबून असल्याने 24 तास विद्युत पुरवठा होत नसल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करीत असतो. मात्र अपुऱ्या वीज पुरवठ्याचा मोठा परिणाम पशुपालन व्यवसायावरही जाणवत आहे.
त्यामुळे विजेची समस्या तातडीने सोडवून शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा अन्यथा आंदोलनाच्या इशारा राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चा चे अध्यक्ष अभय रंगारी, संदीप चौधरी, प्रवीण थुलकर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













