प्रतिनिधी/भंडारा
राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत जिल्हयातील महत्वाचे प्रश्न असल्यास त्याचा मंत्रालयीन पातळीवर पाठपुरवठा करून या शंभर दिवसात 9 प्रमुख मुदयाखेरीज वैशीष्टयपुर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरीक्त मुख्य सचिव उर्जा तथा पालक सचिव आभा शुक्ला यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) यंत्रणांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाउर्जा विभागाचे सौर उर्जीकरणाचे सादरीकरण महाउर्जातर्फे करण्यात आले .सौर उर्जीकरणासाठी शासन आग्रही असून शेतीला सुध्दा सौर उर्जेव्दारे विदयुत पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण
जिल्हाधिकारी डॉ.कोलते यांनी सादरीकरणात 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विभागांचे संकेतस्थळ अपडेट करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, व्हॉट्सॲप चॅटबोट, जनतेच्या तक्रारींचे नियोजन, कार्यालयातील सोयीसुविधा, स्वच्छता, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व सुरू असलेले प्रकल्प, गुड गव्हर्नन्स आदींचे सादरीकरण केले. अन्य विभागप्रमुखांनीही वैशीष्टयपुर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले.रेशीम कार्यालय, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदींच्या वैशीष्टयपुर्ण कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
काय आहे 100 दिवस कृती आराखडा
100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, आदी 9 मुददयांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. 15 एप्रिल 2025 च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन श्रीमती शुक्ला यांनी केले.













