प्रतिनिधी/भंडारा
भंडारा तालुक्यातील खमारी बुटी या लहानशा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्राचीने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत देशासाठी सुवर्णपद पटकावून देशात जिल्ह्याची मान उंचावली आहे. या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
प्राचीने भारतीय आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने भारतीय महिला आट्यापाट्या संघाचे कर्णधारपद भूषवत टिमच्या परिश्रमामुळे अजिंक्यपद स्पर्धेत विश्वचषकावर भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. ग्रामीण भागातील मुलींना खेळात यश मिळविण्यासाठी केवळ शारीरिक मेहनतच नाही तर मानसिक आणि सामाजिक अडथळ्यांचाही सामना करावा लागतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य स्वप्नांनाही साकार करता येते. हे प्राचीने सिद्ध करून दाखविले आहे.
खेळात मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे. शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा, क्रीडा शिबिरे आणि मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत. महिला प्रशिक्षकांची नेमणूक करून मुलींना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक आहे. तसेच सरकारने महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासांठी जाहीर केलेल्या योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलींना खेळासाठी विशेष योजना आखून त्या प्रभावीपणे लागू केल्या गेल्या पाहिजेत. प्राचीला मिळालेल्या यशाने अनेक मुलींना नवी प्रेरणा मिळाली आहे.
शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रात भरारी मारण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. त्यावर मात करण्यासाठी तळमळ अंगात असावी लागते. मुलींना प्रोत्साहन दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात. प्राची चटप च्या यशाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. आणि तिच्या या प्रवासाने समाजातील प्रत्येकाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. आपण मुलींना खेळण्यासाठी, स्वप्न पाहण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी किती प्रोत्साहन देतो? प्राची चटप चा हा प्रवास एका नव्या सुरुवातीचा संकेत आहे. तिच्या यशामुळे खेळात मुलींच्या सहभागाला चालना मिळेल हे खरे.
